Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान

तीन दिवस…. तीन विषय……. तीन विभुती…… तीन अनुभव…..


इतिहासाच एक वादळ जे ७८ व्या वर्षीही घोंगावतय.  ज्या वादळाला कुणी एका बंधनात बांधुन ठेवु शकत नाही…. ते वादळ घोंगावत जात…… आता तुमचा मजबुत पाया ठरवतो की तुम्ही त्या वादळासमोर कसे टिकता. तुम्ही मातीशी पाय घट्ट रोवुन असलात म्हणजे तुम्ही या वादळासमोर तग धरु शकता.   हे वादळ म्हणजे श्री आप्पा परब….. आप्पांनी बोलत जाव मुक्तपणे आणि आपण घेत जाव जितकी आपली पात्रता आहे.  ७८ व्या वर्षी रायगड चढुन जाताना व्यक्त होणारे आप्पा परब खर तर दोन तासाच्या कार्यक्रमात व्यक्त होणं म्हणजे मृग नक्षत्रातल्या एकुण पावसातला एक थेंब जणु…

डॉ. परीक्षित शेवडे आयुर्वेद चे खरे वैद्य अगदि सोप्या भाषेत सांगायच तर आयुर्वेदाचे डॅाक्टर… WHATSAPP वरच्या आयुर्वेद व इतिहास या विषयांवरच्या अंगठेबहाद्दरांचा खरपुस समाचार घेत दोन तास चांगलेच गाजवले. छत्रपति संभाजी महाराजांच्या युद्धनितीबद्दल अगदि हलक्या फुलक्या भाषेत डॅा. परिक्षीत शेवडे यांनी सांगितले.

वय वर्ष २६ अस म्हटल्यावर सभागृहाने टाळ्या वाजविल्या त्या कौस्तुभ कस्तुरे यांनी गाजवला तिसरा दिवस.  बाजिराव मस्तानी आणि अटकेपार झेंडा या पलिकडे पेशवे हे फारसे परिचित नसलेल्या आम्हाला. बाजिराव पेशवे यांच्या प्रमुख चार लढायांबद्दल कौस्तुभ दादांनी अगदि मुद्देसुद समजावले(अटकेपार झेंडा रोवणारे पेशवे वेगळे हा !!)

तिन दिवसाच्या ट्रेकक्षितीज आयोजित व्याख्यानमालेत पहिल्या दिवशी श्री आप्पा परब यांनी छत्रपति शिवाजी महाराज, दुस-या दिवशी डॅा. परिक्षित शेवडे यांनी छत्रपति संभाजी महाराज आणि तिस-या दिवशी कौस्तुभ कस्तुरे यांनी बाजिराव पेशवे या तिन योद्ध्यांच्या युद्धनितीबद्दल जे अनमोल ज्ञान दिले त्यामुळे तीन दिवसांचे ख-या अर्थाने चिज झाले.

Posted in Uncategorized

माकड

 

पडदा उघडतो….

माकड…..
काय शोधताय ? माकड…..
अहो मीच माकड आहे…..
तुम्ही म्हणाल एवढे चांगले कपडे घातलेत आणि स्वत:ला माकड म्हणतो….
अरे हो खरच मी माकड आहे
मी तर म्हणतो तुम्ही सगळे पण माकड आहात
कस ……?
Let me explain
Long Long ago जेव्हा मी छोटा होतो तेव्हा जन्म आणि बालवाडिच शिक्षण डोंबिवलीत आणि वडिलांची नोकरी सुटली म्हणुन १ली ते १०वी पर्यंतच शिक्षण गावी कोकणात.  आता त्यात पण १० वी नंतर उच्च शिक्षणासठि पुन्हा  डोंबिवलीत उच्च शिक्षण म्हणजे काय तर बि. कॅाम. इंजिनिअर बिंजीनायर नाय ओ…तेवढि माकडउडी मी मारलीच नाही. ११ वी पास झालो तेव्हा वाटलेल सि.ए. झाल्याशिवाय मी काय थांबत नाय पण १२ पर्यंत अकांउट विषयाने डोक्याचा पुरा भुगा करुन टाकला मग म्हटल चला गप पारंपरिक पद्धतिने बि. कॅाम होवु.यात पण मध्ये वाटल बँकिंग फायनास्स करु तिथही डाळ शिजली नाह, मग म्हटल हार्डवेअर नेटवर्किंग करु तिथही तिथेही फारसे पार्ट जुळले नाहित.  त्यामुळे गपपणे पारंपारिक बि. कॅाम च भलमोठ कन्व्होकेशन सर्टिफिकेट घेतल.   आता या शिक्षणातल्या माकडउड्या तुमच्यातल्या किती जणांनी मारल्या……एक काम करु माझ हे आटपल की भेटु आपण….आपण आपला एक Whatsapp group बनवु “शिक्षणातल्या माकडउड्या”

बर आता करियर…..  मी तर म्हणतो करियर मधल्या माकडउड्या इथल्या ब-याच जणांनी मारल्या असणार….. अजुन मारत असणार आणि कदाचित पुढे पण मारत असणार…. आज नंबर आला तर मी अॅक्टर आणि नंबर नाहि आला तर गप्प आपलं नमस्कार मी अमुक   अमुक कंपनीतुन धिरज लोके बोलतोय.  आमची कंपनी तुम्हाला फ्री क्रेडिट कार्ड देतेय सर… हा असच असत ते… माझ पण असच होत.  लहानपणी विमान उडताना बघितली तेव्हा ठरलं वैमानिक होणार, डॅाक्टर ला इंजेक्शन देताना बघितल तेव्हा ठरलं ड़़ॅाक्टर होणार. टीवी वर डॅा. कलाम पाहिले तेव्हा ठरलं वैज्ञानिक होणार.  बर त्याच टिव्हिवर अमिताभ पाहिला तेव्हा ठरलं अॅक्टर होणार.  मे च्या सुट्टित गावात क्रिकेट खेळताना मी आमच्या टीम ला एक मॅच काय जिंकुन दिली तेव्हा ठरलं मी क्रिकेटर होणार.  पण जेव्हा बि. कॅाम च सर्टिफिकेट हातात घेतल तेव्हा ठरलं….नाही ठरवलं तेही परिस्थितिने की तु क्लर्क होणार १० वर्ष झाली क्लर्क आहे शाळेत. खरडतोय आपलं.  बर अशा माकडउड्यांचा Whatsapp app गृप नको फेसबुक गृप बनवतो काय Whatsapp ला लिमिट आहे ना मेंबरच.  जाम भेटणार इथे मला माहिती आहे ना.
बरं आता नाजुक विषय प्रेम……आता तुम्ही म्हणाल प्रेम आणि माकडउड्या याचा काय संबंध..… अरे बाबा असतो……कस ?? Let me explain…. इयत्ता ३ री एक सुंदर मुलगी. मी एक नंबर ती दोन नंबर……. अभ्यासात !!! पण मग  ४ थीत मी शाळा सोडुन गेलो… ती तिकडं मी इकडं…  इयत्ता ५ वी… अजुन एक सुंदर मुलगी आता मी ३ रा आणि ती १०-११ वी वगैरे…..अभ्यासात !! पण मग ७ वी त ती शाळा सोडुन गेली.   इयत्ता ८ वी अजुन एक सुंदर मुलगी….. आता तीला विचारेन अस विचार करतच होतो पण मग मात्र इयत्ता १० वी मध्ये आम्ही दोघ शाळा सोडुन गेलो.  ती तिकडे गावी मी इकडे डोंबिवलीत. उच्च शिक्षणासाठी आलो ते….. बि. कॅाम. वाल मग इयत्ता अकरावी कॅालेज लाईफ अजुन एक सुंदर मुलगी… यावेळीही सालाबादप्रमाणे २ वर्ष अभ्यासावर वायफळ वेळ घालवाला आणि १२ नंतर कॅालेज संपवुन नोकरी सुरु.इथेह उडि चुकली.  १३ वी ते १५ वी अजुन एक सुंदर मुलगी आता मात्र तिला विचारणारच होतो इतक्यात तिचा बॅायफ्रेंड असल्याच कळलं आणि यावेळी उडि बरोबर होती फांदिच तुटकी होती.  मग काय दो कदम पीछे आणि पीछे मुडेंगे पिछे मुड… नंतर कामावर, नेहमीच्या ट्रेन मध्ये, बिल्डिंग मध्ये नवीन राहायला आलेल्या अशा अनेक फांद्यांवर या माकडाने उड्या मारल्या कधी फांदि तुटायची तर कधी उडी चुकायची. आता हे माकड म्हणतय मला ना माझ्या आई वडिलांच्या विरोधात नाहि जायचय ते तिच्याशी लग्न करुन संसार करायचा?  या अगोदर किती फांद्या तुटल्या आणि किती उड्या चुकल्या हे कबुल नाहि करायच बाबा. … तर या अशा माकडउड्या आहेत… बर यांचा गृप वगैरे काय बनवत नाय यांनी डायरेक्ट मला फोनच करा काय ९९६९३५९४८६ मी तुमच्या दुःखात सहभागी आहे.

आता अशा या माकडउड्या आपण रोजच्या जीवणात पण मारत असतो.  कामावर जाताना रिक्षा पकडायला माकडउड्या.  स्टेशनला पोचलो फास्ट लोकलच्या प्लॅटफॅार्म ला जायची की स्लो लोकलच्या प्लॅटफॅार्मला त्याच्यासाठि माकडउड्या. नंतर ट्रेन समोर आल्यावर ट्रेन पकडायला माकडउड्या.  बरं ट्रेन पकडली तर उभ रहायला किंवा बसायला माकडउड्या. परत उतरताना गर्दितुन वाट काढत उतरायसाठि माकडउड्या आहेतच.  स्टेशन ला उतरला की लेट मार्क लागु नये म्हणुन कंपनीत पोहोचायसाठी माकड उड्या.   कामाच टार्गेट पूर्ण करण्यासाठि माकडउड्या.  संध्याकाळी पुन्हा घरी जाताना ट्रेन च्या माकडउड्या नशिबात आहेतच.  घरच्यांच्या आणि मित्रांच्या अपेक्षा एकाचवेळी पूर्ण करायच्या म्हणजे त्या पुन्हा माकडउड्या.  घरी जास्त रमलो तर मित्र “बायकोचा बैल” म्हणणार आणि मित्रांत रमलो तर बायको कान चावणार…. बर या प्रकारातल्या माकडांचा मी गृप पण बनवत नाही किंवा फोन पण करु नका.  उद्या सकाळी ट्रेन मध्ये भेटतीलच मला…..

अस हे आपल माकडउड्या प्रकरण जन्मापासुन मरेपर्यंत आपण माकडउड्या मारतच असतो.  कधी इकडे……. कधी तिकडे…. कधी पडतो कधी सावरतो पण उड्या मारायच काहि सोडत नाही.  पण एक मात्र आहे कुणीही तुम्हाला माकड बोलल ना तर नाराज होवु नका कारण तुम्ही माकड आहात म्हणजे उड्या मारताय आणि उड्या मारताय म्हणजे आयुष्यात काहि ना काही तरी करताय.  मग आजपासुन अभिमानाने बोलायच होय मी माकड आहे.

लेखक:- धिरज विजय लोके(डोंबिवली) -९९६९३५९४८६
ही कथा लेखकाची वैयक्तिक मालकिची असुन कुठेहि याचा अंश किंवा संपूर्ण भाग वापरल्यास लेखकाची परवानगी घ्यावी लागेल अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  ही कथा १०, साई प्रतिक बिल्डिंग सुभाष क्रॅास रोड नवापाडा डोंबिवली(प) येथुन दि. १३ जानेवारी २०१८ रोजी रात्री ८:४५ वाजता प्रकाशित करण्यात आली.

Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान, TREKKING

रायगड प्रदक्षिणा – २०१८ (वर्ष १७ वे)

26232076_10212422789819386_4917951422297925489_o

इतिहास अभ्यासता येतो पण भुगोल अनुभवावा लागतो….. या वाक्याची प्रचिती म्हणजे रायगड प्रदक्षिणा. गेली १६ वर्ष नियमितपणे रायगड प्रदक्षिणे चे नियोजन करणारे किरण शेलार यांच्या सोबत या वर्षी जायचा योग आला. जस परमेश्वराच्या चरणाशी आल्यावर त्याच्या उंचीची अनुभती येते तसच या रायगडाच्या पायथ्याशी केलेल्या प्रदक्षिणेनंतर रायगडाच्या उत्तुंगत्वाची अनुभूति येते. शिवरायांनी रायगड राजधानी म्हणुन निवडण्यापुर्वि रायगड परिसराचा अभ्यास केला तेच म्हणजे रायगड प्रदक्षिणा.

रायगडाच्या हत्ती दरवाजाच्या खाली जाणा-या रस्त्याने पुढे जात रोप वेच्या इथे ही प्रदक्षिणा पूर्ण होते. गडाच्या सभोवतालचे संरक्षक किल्ले, व इतर परिसर पाहत जाताना शिवरायांनी पायथ्याच्या परिसरात वसवलेली वनराई हा महाराजांचा दुरदृष्टिपणा दाखवतो. यात पर्यावरणासोबतच रायगड चढाईसाठि प्रतिकुल बनविणे हा विचारसुद्धा असावा. नैसर्गिकदृष्ट्या अभेद्य असलेल्या रायगडाला परिपूर्ण राजधानीचे ठिकाण कसे बनविले असेल हे रायगड प्रदक्षिणेदरम्यान जाणवते.

इतिहास आणि भूगोल किती सुरेख मिश्रण आहे ना…. इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येत नाही पण भूगोल प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजत नाही…….. हा इतिहास ऐकत आणि अभ्यासत, भूगोल ऐकण्याची संधी किरण दादांमुळे मिळाली. या मोहिमेत किरण दादांसोबत पडद्यामागचे कलाकार Kiran Khamkar यांचाही खास उल्लेख करावासा वाटतो. किरण शेलार दादा मोहिमेच्या सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे अगदी शेवटचा सहभागी व्यक्ती पोहोचेपर्यंत किरण खामकर दादा सोबत राहिले.

बऱ्याच वर्षांपासून मनात असलेली हि मोहिम आज पूर्ण झाली.  प्रत्येकाने एकदातरी ही मोहीम करून पहायला हवी. मी २ वर्षांपूर्वी केलेली उंबरखिंड मोहीम जी यावर्षी येत्या ४ फेब्रुवारी २०१८ ला आहे त्याप्रमाणे ही रायगड प्रदक्षिणा मोहीम खऱ्या अर्थाने रायगडाची अजून बाजू उलगडवणारी ठरली.

दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
https://mazeantrang.wordpress.com/
https://dhiruloke.blogspot.in/

Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान, Joy of Happiness

अंधाराशी नाते आमुचे….

24129928_1982760528405818_7353308329609449632_n
होय आमचं या अंधाराशी जून “नातं” आहे. हे नातं आम्ही हौसेने नाही जोडलंय, ते परिस्थितीने लादलंय आमच्यावर….. आम्हीही आस लावून असतो कधीतरी आमच्या आयुष्यात प्रकाश येईल आणि आमची परिस्थिती उजळून निघेल…..
#JoyOfHappiness

माझे अंतरंग
https://mazeantrang.wordpress.com/

Posted in Uncategorized

गाव गाता गजाली

गेल्या काही दिवसात मला अनेकांनी विचारलेला प्रश्न…. तुम्ही “गाव गाता गजाली साठी काम करता  का??? मी फेसबुकवर जे काही जोरात प्रमोशन करत असतो त्यावरून अशी शंका येणं स्वाभाविक आहे.  पण ज्याचा मी भाग आहे त्याचंच कौतुक करायला हवं असं काही नाहीय ना…. गाव गाता गजाली या झी मराठी वरील या मालिकेचे कला दिग्दर्शक माझ्या शाळेचे चित्रकला शिक्षक नेवगी सर(Rupesh Nevagi) आहेत. या मालिकेच्या आता प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांचे चित्रीकरण मिठबाव मध्ये झाले आहे.  बस माझं गाव, माझे सर याच्याशी जोडलेत म्हणून या मालिकेविषयी फेसबुक वरून प्रमोशन करत असतो. माझ्या याच भावनांना वाट मोकळी करण्यासाठी एक हक्काची जागा मिळवून दिली ती ईशान्य वार्ता चे संपादक रानडे काकांनी(Uttam Ranade).
रानडे काकांनी मला गाव गाता गजाली विषयी त्यांच्या दिवाळी अंकात लेख लिहिण्यासाठी विचारलं आणि माझ्या मनात चाललेले विचार मला कागदावर उतरवायची नामी संधी मिळाली. रानडे काकांबद्दल मी स्वतंत्रपणे लिहीनच. गाव गाता गजाली चे कला दिग्दर्शक, कलाकार नेवगी सर आणि संपूर्ण गाव गाता गजाली ची टीम चे शतशः धन्यवाद आणि अभिनंदन…. आणि खास धन्यवाद रानडे काकांच तुमच्या दिवाळी अंकात माझ्या भावनांना जागा दिलात….
तुम्हाला हा दिवाळी अंक आणि ईशान्य वार्ता चे त्रैमासिक हवे असल्यास संपर्क करा :-
९९६९०३८७५९
९७०२५२५४३५

 

Posted in कथा (मैत्री)

बेधुंद मैत्रीचे बंध…

Pratilipi Result

“प्रतिलिपी मराठि” आयोजित “बंध मैत्रीचे” या स्पर्धेत “बेधुंद मैत्रीचे बंध” या माझ्या कथेला वाचकसंख्येनुसार दुसरा क्रमांक मिळाला.

धन्यवाद त्या सर्व वाचकवर्गाचे ज्यांनी माझा हा छोटासा प्रयत्न गोड मानुन घेतला. धन्यवाद प्रतिलापि मराठी एक चांगली संधि उपलब्ध करुन दिलात.

कथा वाचण्यासाठि या लिंक वर क्लिक करा
https://marathi.pratilipi.com/dhiraj-loke/bedhund-maitri

Posted in Uncategorized

वाघिणीचा हैप्पी बड्डे….

IMG-20170627-WA0004
आज या ठिकाणी… आमच्या सामानगडच्या वाघिणी, रणरागिणी वैष्णवी(Vaishnavi Todkar) ताई चा हैप्पी वाला बड्डे आहे….. या फोटुत वैष्णवी ताई माझ्या उजव्या बाजूची…. या दोन बहिणींवर मी “माझे अंतरंग(भटकंती विशेष)” या पुस्तकात “वाघिणी त्या रणरागिणी” हा लेख लिहिला.  यांच्यावर लेख लिहिला कारण या आमच्या ताया काय “नाय करू शकत” याची यादी करायला हवी कारण ही यादी छोटी असेल.  या काय काय करतात त्याची झलक म्हणून सांगायचं तर या कराटे खेळतात, लाठी काठी, दांडपट्टा चालवतात आणि इतर मुलींना शिकवतात,  volleyball, कबड्डी सारखे खेळ खेळतात, चित्र काढतात, साप पण पकडतात आणि महत्वाच म्हणजे दर रविवारी गडावर जाऊन श्रमदान करतात बरं इतकं सगळं करून  उत्तम अभ्यास पण करतात हा !!!
वैष्णवी ताय तशी दोघींमध्ये “रागीट” हाय अशी अंतर्गत सूत्रांची खबर हाय…. मला भेटल्यावर ती इतकंच बोलत असेल “एवढं शांत कुणी कसं काय बसू शकत??” बरं ही चिंटुकली दिसणारी वैष्णवी ताय WWE  फायटिंग करते ती पण सचिन रेडेकर बरोबर…. आत्ता बोला….. अगदी खूप काय करून आम्हा दादा लोकांना फिलिंग Proud वगैरे करणाऱ्या या वाघिणी, रणरागिणीला जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा…. खूप यशस्वी हो आणि आम्हा चिंटुकल्या दादा लोकांवर कृपा राहूदे…..

दुर्गवीर चा धीरु

Posted in Book Review ( पुस्तक परिचय)

उजेडाचे डोळे ओले

 

जगात “नम्र” माणसांचे दोन प्रकार असतात एक जे मुळात “नम्र” नसतात पण सामाजिक परिस्थिती बघून “नम्रपणा” स्विकारतात आणि दुसरे जे मुळात,निसर्गतःच किंवा संस्काराने नम्र असतात. यातल्या दुसऱ्या प्रकारात मोडणारा एक व्यक्ती म्हणजे “उमेश जाधव“.  दोस्त म्हणतो च्या निमित्ताने भेट झालेल्या उमेश बंधूंचा पहिला काव्यसंग्रह “उजेडाचे डोळे ओले” च्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज जाणं झालं.  पोवाडा, लावणी,मुक्तछंद, भारूड सारखे दुर्मिळ प्रकार जे आजच्या आमच्या पिढीला क्वचितच माहित असतील अश्या विविध काव्यप्रकारातील तब्बल ४३ कवितांचा अनमोल खजिना उमेश दादांनी या पुस्तकात मांडलाय.  उमेश दादांच्या कवितांची समीक्षा वगैरे करण्याचं धाडस मी करूच शकत नाही तितकी पात्रता माझ्यात नाही.  एक व्यक्ती म्हणून मला उमेश दादांच कौतुक करावंस वाटत.  कारण तुम्ही कवी, लेखक, कलाकार म्हणून कितीही चांगले असलात तरी “माणूस” म्हणून कसे आहात हे महत्वाच असतं.  उमेश दादा कवी म्हणून जितके ग्रेट आहेत तितकेच माणूस म्हणून नम्र आहेत.

दोस्त म्हणतो च्या त्रिकुटातील विजय बेंद्रे जर कवितेतून विद्रोह करत असेल आणि मेघांत प्रेम मांडत असेल तर उमेश दादा दुःख, व्यथा मांडतात किंबहुना तुम्हाला तुमच्या एखाद्या व्यथेशी, दुःखाशी समरस करून व्यक्त करायला भाग पाडतात. सूत्रसंचालक सौरभ नाईक यांनी आजच्या कार्यक्रमात उमेश दादांच्या माळीण दुर्घटनेबाबतच्या कवितेची एक आठवण सांगितली. माळीण दुर्घटनेबाबत उमेश दादांची एक कविता वर्तमानपत्रात छापून आली होती त्यावेळी पुण्याच्या एका व्यक्तीचा उमेश दादांना फोन आला.  त्या व्यक्तीच्या नात्यातील ८-१० माणसं या दुर्घटनेत जागीच गेली. कामाच्या निमित्ताने ती व्यक्ती पुण्याला आल्याने या अपघातातून वाचली.  या दुर्घटनेनंतर ह्या व्यक्तीच्या जणू संवेदना नष्ट झाल्या होत्या की काय म्हणून तो मोकळेपणाने रडू शकला नाही.  पण उमेश दादांची कविता वाचल्यावर तो मोकळेपणाने रडला. यावरून उमेश दादांच्या कवितेचा दर्जा लक्षात येतो. बरं इतकं दर्जेदार असूनही साधं भोळं राहणं कसं जमत कुणास ठावूक ?? Social दुनियेतल्या Like, Comment च्या बाजारापासून अगदी दूर कुठेतरी हा “उमेश वामन जाधव” नावाचा तारा चमकतोय.  तुम्हाला Whatsapp, Facebook वर सामाजिक विषयावरील एखादी अनामिक कविता जर आली तर ती कदाचित उमेश दादांची असू शकते आणि “कवितेखाली माझे नाव का नाही” याचा दोन ओळींचा साधा निषेधही दादा कधी व्यक्त करीत नाहीत.कार्यक्रमात त्यांच्या मित्रानी सांगितल्याप्रमाणे दादा मैत्रीखातीर अश्या कितीतरी रचना विनामूल्य स्वतःच नाव न लावता देतात आणि आम्ही आमचा फेसबुकचा चार ओळींचा स्टेटस चोरला तर दोन पानांचा निषेधाचा लेख लिहितो.  खरंच दादा जमलं तर तुमच्यातला नम्रपणा थोडासा… अगदी एक टक्का जरी आम्हाला दिलात तर खूप बरं होईल.
आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात चंद्रशेखर सानेकर, संदीप माळवी, प्रशांत मोरे, उंच माझा झोका या गीताचे गीतकार आणि जेष्ठ कवी  अरुण म्हात्रे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.  या मान्यवरांच्या सोबत उमेश दादांच्या आईवडिलांचा सत्कार होणं मला वाटतं उमेश दादांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण असावा. दादांनी कवितासंग्रहाच्या अर्पण पत्रिकेतच लिहिलंय की, “ज्यांच्या उजेडाच्या कष्टात, मी माझ्या आयुष्याची कविता वाचतो आहे त्या माझ्या आईवडिलांना सविनय अर्पण”….खरंच त्या माता पित्याला अभिमान वाटावा असं लेकरू आहे त्यांचं…..
उमेश दादांच्या पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना अमोल शिंदे बोलले की मला आनंद यासाठी वाटतोय की आमच्या पिढीच एक पुस्तक आलंय… खरंच आमच्या पिढीचं कवितेचं एक पुस्तक आलय याचा आम्हाला अभिमान वाटतोय. प्रत्येकाने कवितेचे नेमके काय प्रकार असतात नुसतं हे जाणून घेण्यासाठी तरी हे पुस्तक वाचलं तरी डोक्यात प्रकाश पडेल.
याअगोदर ज्या माळीण दुर्घटनेवरील कवितेचा उल्लेख केला त्या कवितेतील मला भावलेल्या ओळी…..
निष्पाप गेले जीव,
काय त्यांचा गुन्हा,
वाचलेला बाळ आता,
आई म्हणेल कुणा…..
काव्यसंग्रहाचे नाव :- उजेडाचे डोळे ओले
कवी :- उमेश वामन जाधव (8879803162)
प्रकाशक:- सई प्रकाशन, मुंबई
मुखपृष्ठ :- विष्णू थोरे
पृष्ठसंख्या :- ६७
मूल्य :- रु.८०/-
Posted in दुर्गवीर प्रतिष्ठान

सामानगड दुर्गसंवर्धन…..

21317897_1424111287624745_910177232422793554_n
तुम्ही करीत असलेल्या कामाचं जेव्हा कौतुक होत तेव्हा बरं वाटत पण  एखादं कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी  फक्त कौतुक पुरेस नसतं त्यासाठी हवा असतो  सक्रिय सहभाग आणि सहकार्य ….. महाराष्ट्रभर दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे होत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कार्यात असा सक्रिय सहभाग जेथे सर्वात उल्लेखनीय स्वरूपात लाभला तो कोल्हापूर (गाडींग्लज) परिसरातील सामानगड येथे.  साधारण ५ वर्षांपूर्वी संतोष हसूरकर (अध्यक्ष :- दुर्गवीर प्रतिष्ठान) यांना या गडावरील वास्तू आणि इतिहास जपण्याची गरज आहे याची जाणीव झाली होती.  याच जाणिवेतून सुरु झाला प्रवास सामानगड संवर्धनाचा….. संतोष हसूरकर यांनी स्थनिक तरुणांना एकत्र करून संवर्धनाला सुरुवात केली. कैलाश पारिट, दीपक जगदाळे या सारखे अनेक तरुण तयार केले.  आज दर रविवारी १५ जणांची एक टीम इथे येऊन काम करते त्या प्रत्येकाचे नाव घेणं  शक्य नाही पण प्रत्येक हाताने गेल्या ३-४ वर्षात घेतलेली मेहनत आज सामानगडाच्या कामात महत्वाचे ठरत आहे.  ह्या संपूर्ण प्रवासात जसं स्थानिक कार्यकर्ते तयार होणं गरजेचं होत तसच शासकीय अधिकाऱ्यांच सहकार्य अत्यंत आवश्यक होत.  वन विभागाचे अधिकारी काटकर सर आणि पुरातत्व विभाग आणि स्थानिक शासकीय अधिकारी अगदी आपलेपणाने दुर्गवीर च सहकार्य करू लागले.  आपल्याकडे एक म्हण आहे सरकारी काम सहा महिने थांब अशी काहीशी पण या सर्व अधिकाऱ्यांनी मात्र ते या म्हणीला अपवाद असल्याचे दाखवून दिले.  अगदी मोठ्या भावाने लहान भावाला समजावून सांगावे इतकं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सहकार्य केले. मी कोणी मोठा सरकारी अधिकारी आहे मग मी का या गोष्टी सांगू??? असा कोणताही उद्धेश त्यांचा नव्हता. स्थानिक तरुण तरुणी आणि सरकारी अधिकारी यांच्या सहकार्याने आज समानगडाचे काम नियमितपणे सुरु आहे.  मूळ गाव जवळ असले तरी स्वतःच्या गावी जितक्या फेऱ्या होत नाहीत त्यापेक्षा जास्त वेळा सामानगड परिसरात ये जा करून संतोष हसूरकर तिथल्या कामाचा आढावा घेत असतात. दुर्गवीर प्रतिष्ठान हे कार्य वाढत असताना त्यात अजून एक दुग्धशर्करा योग्य जुळून आला. गेल्या काही महिन्यांपूर्वी “छत्रपती संभाजी महाराज”(कोल्हापूर) यांनी दुर्गवीर च्या कार्याची माहिती घेतली आणि राज्यभिषेकाप्रसंगी सामानगडावर काम करणाऱ्या प्रत्येक दुर्गवीराचा सत्कार करण्यात आला.  गेल्या महिन्यात “छत्रपती संभाजी महाराज” यांनी समानगडाला प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि कामाची पाहणी केली. सामानगडाला पुन्हा ते वैभव मिळवून देण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.   “छत्रपती संभाजी महाराज” यांची साथ हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे.
स्थानिक दुर्गवीर, स्थानिक लोक, सरकारी अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने सामानगडाला शिवकालीन वैभव परत मिळवून देण्यात दुर्गवीर प्रतिष्ठान नक्कीच यशस्वी ठरेल हा मला विश्वास आहे……